अकोला(दि.२०):
साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात सातत्याने विविध उपक्रमांचे,महोत्सवांच्या नियोजनबद्भ आयोजनासह व नागपूर व पुणे येथील दोन राज्यस्तरीय साहित्य संमेलनांचे यशस्वी आयोजन करून साहित्यिकांना वैचारिक व सांस्कृतिक मेजवानी देणार्या नागपूर येथील ‘मनमंथन वाचन व लेखन समूह’च्या वतीने माहुली कृषी पर्यटन, पाराशिवनी,नागपूर येथे दि.२४,२५ व २६ फेब्रुवारी रोजी आयोजित केलेल्या ‘तिसर्या राज्यस्तरीय मनमंथन मराठी साहित्य संमेलना’च्या ‘संमेलनाध्यक्ष’पदी राष्ट्रीय स्तरावर साहित्य,नाट्य व शिक्षण क्षेत्रातील भरीव कार्य व लेखनाने स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केलेल्या अकोला येथील प्रख्यात कवयित्री,कथा व नाट्य लेखिका तथा अभ्यासू वक्त्या प्रा.दीपाली आतिश सोसे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असल्याची माहिती मनमंथन लेखन-वाचन समूहाच्या अध्यक्षा प्रेरणा वाडी आणि संमेलनाच्या प्रमुख संयोजिका मंजूषा विश्वेकर यांनी दिली आहे.याआधीही तरुणाई फाऊंडेशन,कुटासा यांच्या वतीने अकोला येथे आयोजित सहाव्या तरुणाई साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे.
प्रा.दीपाली सोसे ह्या लेखिका, व्याख्यात्या,शिक्षणतज्ञ, मराठी भाषा अभ्यासक आणि अभिनय गुरु म्हणून प्रसिध्द आहेत.त्यांनी तीन विषयांमध्ये पदवी,सहा विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त करुन बी.एड.सीईटी परीक्षेत महाराष्ट्रातून नववी व ‘नाट्यशास्त्र’ परीक्षेत महाराष्ट्रातून पहिल्या तसेच एम.फिल.परीक्षेतही प्रथम येण्याचा बहुमानही मिळाला आहे.आतापर्यंत त्यांची एकूण पासष्ट पुस्तके प्रकाशित झाली असून,त्यांनी लिहिलेली पुस्तके सीबीएसई व आयसीएसई शाळांमधून क्रमिक पाठ्यपुस्तके म्हणून नर्सरी ते आठव्या वर्गांच्या विद्यार्थ्यांना शिकविली जातात.
त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या पाणलोट विभागात ‘जिल्हा प्रशिक्षण समन्वयक’म्हणून भरीव कार्य केले असून सध्या त्या सिताबाई कला महाविद्यालयामध्ये पदव्युत्तर पदवी मराठी विभागात अध्यापनाचे कार्य करीत आहेत.आजवर त्यांना एक्कावण्णहून अधिक प्रतिष्ठित पुरस्काराने गौरविण्यात आले असून त्यांची पुस्तके ब्रेललिपीतही अनुवादित झाली आहेत.त्यांनी लिहिलेल्या ‘रंग दे बसंती’ या नाटकाचे महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये प्रयोग झाले असून त्यांची पुस्तके ग्रंथालयाच्या शासनमान्य यादीत समाविष्ट झाली आहेत.
त्यांनी अकोला येथे आनंदी गुरुकुल अँक्टिंग अकॅडमीची स्थापना करुन सुमारे दिडशेहून अधिक विद्यार्थ्यांना मराठी, हिंदी, तमीळ, तेलुगु भाषेतील चित्रपट, वेबसिरीज, लघुपट, मालिका व रंगभूमीच्या माध्यमातून संधी मिळवून देत आतापर्यंत वीसहून अधिक लघुचित्रपट,अल्बमची निर्मिती,लेखन व दिग्दर्शनही त्यांनी केले आहे.
अशा अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या लेखिका ‘संमेलनाध्यक्ष’ म्हणून लाभल्या,याचा संपूर्ण मनमंथन समूहाला आनंद झाल्याचे संस्थापक,अध्यक्ष प्रेरणा वाडी,मंजूषा विश्वेकर आणि संपूर्ण मनमंथन समूह यांनी कळविले आहे.यापूर्वी सुपरिचित साहित्यिक मनोज मोहिते हे नागपूर येथील पहिल्या आणि ग्रामीण साहित्यिक बबन पोतदार हे पुणे येथील दुसर्या मान्यवर साहित्यिकांनी पहिल्या दोन साहित्य संमेलनांचे संमेलनाध्यक्षपदे भूषविली आहेत.तिसरे संमेलनही संस्मरणीय ठरेल,असेच भव्य आयोजन आहे,असेही पत्रकाव्दारे कळविले आहे.