गडचिरोली जिल्ह्यातील झाडीपट्टी म्हणून प्रसिद्ध असलेला अतिशय दुर्गम भाग म्हणून ओळखला जाणारा कुरखेडा.अशा या कुरखेडा ला नियमित वर्तमानपत्राच्या पानावर तसेच समाज माध्यमावर आपल्या लेखणीतून तेजांकित करणाऱ्या साहित्यिक संगीता संतोष ठलाल ताईं यांचा आज वाढदिवस,ताईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
संगीताताई ठलाल आपल्या विविध रुपी लेखणीतून अनेक विषयावर आपले अभ्यासू आणि मार्गदर्शक मत मांडत असतात ज्यामुळे आजच्या नव्या पिढीच्या वाचकांना,कवी लेखकांना अनेक गोष्टी विस्तृतपणे समजण्यास मदत होते.संगीता ताई विविध वर्तमानपत्रे,मासिके,साप्ताहिक, दिवाळी अंक आणि इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून लेख लेखन, काव्य लेखन, चारोळी अलक, हायकू तसेच विविध विषयावरील लेख आणि पुस्तकांचे समीक्षण अशा विविध रुपी भूमिकेतून जात असताना प्रत्येक दिवशी संगीता ताईंची लेखणीच्या माध्यमातून आमच्याशी भेट होत असते. त्याशिवाय एकही दिवस जात नाही.
अनेक सामाजिक माध्यमावर विचारधारा हे सदर ताई अप्रतिम रित्या मांडत असतात. यातून खूप काही शिकण्यासारखे असते. संगीताताई ठलाल या व्यवसायाने शेतकरी गृहिणी आहेत.लहानपणी घरची आर्थिक परिस्थिती गंभीर असल्याने ताईंना समाजातील प्रत्येक गोष्टीची जाणीव आहे.अनेक परिस्थितीवर मात करून अविरत प्रयत्नशील असले पाहिजे, तरच यश मिळते. यासाठी जागृत असणे महत्त्वाचे आणि ही जागृती आपल्याला वाचनातून मिळते असे ताईंचे ठाम मत व्यक्त करताना पुढे आपला अनुभव सांगतात तो म्हणजे लहानपणी चौथीच्या वर्गात शिक्षण घेत असताना संगीता ताई किराणा दुकानातील रद्दीमधील वृत्तपत्रे वाचायच्या ते वाचून त्यांच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण झाली. आणि पुढे तेच वाचन आपल्याला प्रगल्भ करत गेले.वाचनाचा छंद जडल्यानं नियमित वाचन शिक्षणासाठी आणि आजच्या साहित्य लेखणीसाठी उपयोगी पडले.
आज अनेक वर्तमानपत्रात विविध विषयावर भाष्य करण्यासाठी वाचन ही तितकेच महत्त्वाचे असते. संगीता ताई यांचे शिक्षण बारावीपर्यंत झाले. आज पर्यंत त्यांनी मराठी बोली पुणे संस्थेत सरचिटणीस पदी, विदर्भ लेखिका गडचिरोली शाखेत संयोजिका पदी, काव्यांगण साहित्य मंच तथा सामाजिक बहुउद्देशीय संस्थेत महाराष्ट्र सचिव पदी अशा विविध पदावर कार्यभार सांभाळून प्रभावी कार्य केले. विविध विषयावर अनेकदा ज्या स्पर्धा घेतल्या जातात त्यामध्ये काव्य लेखन, लेख लेखन यामध्ये प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक असे विशेष यश प्राप्त करून इतरही ठिकाणी यशस्वीता प्राप्त करण्यासाठी तत्पर असतात. मनाशी जिद्द ठेवतात. अविरत पुस्तकांशी मैत्री करतात आणि आजच्या पिढीला वाचनाचे महत्त्व पटवून देतात.
शैक्षणिक वाचनाबरोबर अवांतर वाचनाची गोडी विद्यार्थ्यांना लावून घेणे महत्त्वाचे आहे.वाचनानेच माणसाला चांगल्या-वाईट,योग्य-अयोग्यतेची पारख आणि सभोवतालचे भान येते.जोपर्यंत आपण चांगले वाचणार नाही तोपर्यंत चांगले लेखन करता येणार नाही असे अनुभवाचे मत व्यक्त करतात. अनेक शाळा, तसेच गावातील विविध ठिकाणी विशेष कार्यक्रमात विद्यार्थी वर्गाला समाजसुधारकांच्या विशेष माहितीचे दाखले देऊन विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी ताई पुढाकार घेऊन कार्य करत असतात तसेच अनेक शाळांमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांना शाळेत येण्यासाठी मुलांमध्ये शाळेची गोडी निर्माण होण्यासाठी त्यांना भेटवस्तू देण्यासाठी संगीताताई स्वतः उपस्थित राहून विद्यार्थ्यांशी संवाद साधतात.ताई आपल्या प्रत्येक वाढदिवसाला विविध ठिकाणी आदिवासी भागात जाऊन भेटवस्तू देतात.
दिव्यांग मुलींना मदत करतात.अनेक लेखक कवी फक्त आपले लेखन करण्यातच धन्य मानतात परंतु संगीता ताई ठलाल या आपल्या लेखणीबरोबरच समाजकार्य कर्तुत्वातही सदा अग्रेसर असतात.कोरोनाच्या काळात लोकांना मदत करण्यासाठी ताईंनी महत्वाची भूमिका बजावली अनेक वस्त्यात जाऊन मदत केली, कलार समाजाच्या विकासासाठी नागपुर येथे निघालेल्या भव्य मोर्चा असो किंवा ओबीसी महासंघ शाखा कुरखेडा यांच्यावतीने घंटानाद आंदोलन असो ताईंचा सामाजिक क्षेत्रातील सर्वच ठिकाणी भूमिका घेण्याचा निर्णय महत्वाचा असतो आणि तो इतरांनाही प्रेरणादायी असतो.रक्तदानासारखा विशेष कार्यक्रम असो किंवा देऊळ गाव येथील विधवा महिलांचा आदर सत्कार कार्यक्रम असो ताई अशा कार्यक्रमात हृदयीमनातून पुढाकार घेऊन कर्णधारपदी असतात.
आजपर्यंत संगीता ताईंचे उल्लेखनीय अप्रतिम कार्याबदल ९०पेक्षा अधिक वेळा सत्कार झाले आहेत.नियमित वाचन-लेखन आणि लेखणी प्रमाणे समाजभान जपणारी कृती यामुळे ताईंना अनेक कार्यक्रमात विविध ठिकाणी प्रमुख पाहुणे, कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान तर कधी व्यवस्थापन तर काही ठिकाणी परीक्षणाची भूमिका बजावण्यासाठी ताईंना आमंत्रित केले जाते.
आजच्या पिढीसाठी अनेक महत्तम विषयावर संगीता ताईं सातत्याने लिखाण करत असतात त्यामध्ये विशेष करून रानभाज्यांच्या जगात या सदरामध्ये खूप मार्गदर्शक माहिती आम्हाला सर्व वाचकांना मिळत असते.बहुगुणी दातन, गुणकारी काशीकोहळा,तसेच आंबील यासारखे वाचनीय लेख वाचून वाचकांच्या अनेक आठवणींना उजाळा मिळतो कारण काही ठिकाणी जुन्या – रीती परंपरा पद्धती बदलत गेल्या त्याच पद्धतीने राहण्या- खाण्याच्या पिण्याच्या पद्धती ही बदलत गेल्या आणि अशा अशा परिस्थितीत ताईंच्या लेखणीमुळे शहरी भागातील वाचकांना असे विषय वाचतांना एक वेगळे समाधान मिळते. त्यांच्या विविध विषयांच्या लेखनातून वाचनाचा आनंद आम्ही घेत असतो त्या लेखनातून अभ्यासपूर्ण माहिती मिळते.
तसेच त्यांच्या ‘मी वाचलेले कथासंग्रह निंब,’ ‘अभ्यासपूर्ण माहिती मधमाशी संशोधक, ‘छायाच्या त्यागातून संपन्न झालेले दुसरे साहित्य संमेलन! यामधील लेखन तसेच ती कुठे काय करते, मधील लेखन,तसेच निसर्गाचे गुणगान करणारा ‘चंद्रबन’ काव्यसंग्रहाचे समीक्षण हे सर्वच वाचनीय आणि अप्रतिमच. लेखणीप्रमाणे अविरत सामाजिक भान जपणाऱ्या ताईंनी मरणोत्तर दोन्ही नेत्र स्व-इच्छेने दान करण्याचा संकल्प केला आहे.आणि मी अमित कांबळे स्वतःही मरणोत्तर नेत्र दानाचा संकल्प केला आहे.आमच्या सर्व वाचक-लेखक सदस्यांकडून संगीता ठलाल ताईंना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हृदयी मनातून दिलदार शुभेच्छा.
अमित जयवंत कांबळे
मु. विल्ये, जि.रत्नागिरी – ९८९२४१६८१३.