रत्नागिरी तालुक्यातील नाणीज येथील नालंदा बुद्ध विहार येथे त्याग मूर्ती माता रमाई यांची १२७ वी जयंती महिला मंडळाचे अध्यक्ष प्रतिभा कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली तर सेवानिवृत्त ज्येष्ठ शिक्षिका सुलभा कांबळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली साजरी करण्यात आली.
सदर कार्यक्रमाचे आयोजन आम्रपाली महिला मंडळ व नालंदा बौद्धजन मंडळ स्थानिक व मुंबई यांचे संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात बुद्ध वंदना व धार्मिक पूजापाठाने करण्यात आली. यावेळी गावचे पोलीस पाटील व मंडळाचे उपाध्यक्ष नितीन कांबळे व प्रमुख अतिथी सुलभा कांबळे यांनी त्याग मूर्ती माता रमाई यांनी शेण गोवऱ्या थापून अतिशय परिश्रम घेऊन आपला संसार चालविला.
अनेक दुःखद प्रसंग झेलले, पण त्या दुःखाची झळ आपले पती परदेशी उच्च शिक्षणाच्या पदव्या घेणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बसू दिली नाही. त्यांच्या शिक्षणात अडथळा आणला नाही, अशा विविध प्रसंगाचं सविस्तर वर्णन त्यांनी यावेळी केलं.या कार्यक्रमाला मंडळाचे सर्व कार्यकर्ते तसेच आम्रपाली महिला मंडळाच्या सर्व पदाधिकारी व सभासद उपस्थित होत्या शेवटी अध्यक्षीय मनोगत प्रतिभा कांबळे यांनी मानले व उपस्थित सर्वांचे आभार मानले.