येथील सुपरिचित बालकलाकार तथा बालवक्ता चि.स्वराज दीपाली आतिश सोसे याने महाराष्ट्र राज्याच्या राजधानी असलेल्या मुंबई महानगरातील भेटीत विविध क्षेत्रातील मान्यवरांची मने जिंकून शुभाशीर्वाद मिळविले आहेत.अवघ्या दहा वर्षे वयाचा हा सुकुमार बालकलाकार आपल्या लाघवी व सहज अभिनयाने,प्रचंड आत्मविश्वासाने तसेच उत्स्फूर्त हजरजबाबी प्रश्नोत्तरांनी नकळत मान्यवरांच्या मनाला भूरळ घालत आपला साधेपणा व वेगळेपणा जपतो,ही खरोखरंच कौतुकास्पद बाब असल्याचे गौरवोद्गार सर्वच मान्यवरांनी यावेळी काढले.
स्वराजने नुकत्याच घेतलेल्या मुंबई येथील मान्यवरांच्या भेटीत महाराष्ट्रभूषण,पद्मश्री प्रख्यात अभिनेते अशोक सराफ,प्रसिध्द दिग्दर्शिका कांचन अधिकारी,महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ,महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांचे सचिव डाॅ.श्रीकर परदेशी,विधान भवन विशेष कार्यकारी अधिकारी शिवप्रसाद जटाले,मंत्रालयाच्या संरक्षण विभाग मुंबईचे उपायुक्त प्रशांत परदेशी,विनोदी अभिनेते निनाद शेट्ये,पाणिनीच्या अध्यक्ष संगीता चव्हाण यांच्यासह विविध मान्यवरांनी स्वराजच्या यशस्वी वाटचालीचा गौरव करीत त्याच्या अभिनय कौशल्याबाबत कौतुकाचा वर्षाव केला.
माझ्या आजी,आजोबा, आई,बाबांकडून नेहमी ज्यांच्या आदर्श व्यक्तिमत्वाविषयी सातत्याने ऐकत आलोय,अशा ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ,प्रसिध्द दिग्दर्शिका कांचन अधिकारी,प्रसिध्द आयएएस अधिकारी डाॅ.श्रीकर परदेशी यांच्यासह सर्वच गणमान्य विभूतींची भेट व त्यांनी दिलेले शुभाशीर्वाद,त्यांनी केलेले अमूल्य मार्गदर्शन,त्यांचेशी साधलेला दीर्घ सुसंवाद व त्यांनी माझे भरभरुन केलेले कौतुक ही माझ्यासाठी अनमोल भेट असल्याची प्रांजळ भावना यावेळी स्वराजने व्यक्त करून मंत्रालय व विधान भवन पाहतांना तसेच मंत्री महोदयांनी दिलेले बक्षीस व कौतुकाने भारावून गेल्याचेही त्याने यावेळी सांगितले.स्वराजच्या प्रमुख भुमिकेत येत असलेल्या आगामी ‘काटा’ या मराठी चित्रपटातील भुमिकेकरिता मान्यवरांनी त्याला शुभेच्छाही दिल्या आहेत.