श्रीप्रभुप्रसाद माध्यम समूह,बीडच्या वतीने वीरशैव लिंगायत समाजासाठी प्रकाशित करण्यात येत असलेल्या आणि वीरशैव समाजातील कर्तृत्वसंपन्न महिला भगिनींना समर्पित ‘कालांतर २०२५’ या रंगीत व कृष्णधवल दिनदर्शिकेचे प्रकाशन जगद्गुरू श्री पलसिध्द धर्मपीठ,साखरखेर्डाचे मठाधिपती शिवाचार्यरत्न, वेतांदाचार्य सद्गुरू श्री सिध्दलिंग शिवाचार्य स्वामीजींच्या शुभहस्ते रविवार दि. ३ नोव्हेंबरला ‘भाऊबिजेचे’औचित्य साधून समारंभपूर्वक करण्यात येणार असल्याची माहिती श्रीप्रभुप्रसाद माध्यम समुहाचे संस्थापक,संपादक परमेश्वर लांडगे यांनी दिली आहे.
या प्रकाशन सोहळ्यास जगद्गुरू श्री पलसिध्द धर्मपीठाचे नुतन शिवाचार्य सद्गुरू श्री सिध्दचैतन्य शिवाचार्य स्वामीजी, केंद्रिय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री,भारत सरकार नामदार प्रतापराव जाधव,प्रख्यात अभिनय गुरू आणि सीबीएसई आणि आयसीएसई शाळांमध्ये शिकविल्या जाणार्या ‘अभिजात मराठी’ आणि ‘माय मराठी’ या क्रमिक पाठ्यपुस्तकांच्या ख्यातनाम लेखिका प्रा.दीपाली सोसे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
गेल्या पाच वर्षांपासून श्रीप्रभुप्रसाद माध्यम समुहाच्या वतीने कालांतर ही वीरशैव दिनदर्शिका प्रकाशित करण्यात येत आहे. यंदा कालांतर दिनदर्शिकेच्या माध्यमातून वीरशैव लिंगायत समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनिय काम करणार्या आणि समाजासाठी प्रेरणादायी असलेल्या दहा प्रतिभासंपन्न महिलांचे परिचय समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे.त्यासोबतच वीरशैव सामाजाच्या विविध शाखा व मठांमध्ये साजरे होणारे वार्षिकोत्सव, सण आदिंची तिथीनुसार माहिती, वीरशैव समाजाच्या दिवंगत जगद्गुरू, शिवाचार्य यांचे पुण्यस्मरण दिन, विद्यमान धर्मगुरूंचे जन्मदिवस, समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करीत या समाजाचा सामाजिक स्तर उंचावणार्या मान्यवरांचे वाढदिवस, त्याचप्रमाणे वीरशैव सिध्दांताची परिपूर्ण माहिती समाजाला करून देणारे चिंतनीय लेख आणि राज्यातील वीरशैव प्रवचनकार व कीर्तनकार यांची त्यांच्या पत्त्यासह माहिती आदींचा समावेश करण्यात आला आहे.
श्रीक्षेत्र साखरखेर्डा येथील जगद्गुरू श्री पलसिध्द सभागृहात रविवार दि. ३ नोव्हेंबर रोजी होणार्या या प्रकाशन सोहळ्यास वीरशैव समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन श्रीप्रभुप्रसाद माध्यम समुहाचे संस्थापक, संपादक परमेश्वर लांडगे, मार्गदर्शक विलासअप्पा लांडगे,समन्वयक आतिश सोसे, सहसंपादक विकास लांडगे यांनी केले आहे.