मेहकर, प्रतिनिधी
मागील चार महिन्यांपासून ज्येष्ठ वयोवृद्ध साहित्यिक व कलावंत यांना त्यांचे मानधन खात्यात जमा ना झाल्यामुळे या परिवारावर उपासमारीची वेळ आली असून महत्त्वाचा असणारा दिवाळी सण यावेळी कलावंतांना अंधारात साजरी करावी लागणार आहे.
संपूर्ण राज्यात सांस्कृतिक कार्यालय संचालनालय मुंबई मार्फत राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलावंत सन्मान योजना राबविण्यात येत आहे. कलेच्या क्षेत्रात दीर्घकाळ मोलाचे कामगिरी बजावणाऱ्या कलावंतांना शासनाकडून सन्मान म्हणून दर महिन्याला पाच हजार रुपये मानधन देण्यात येते. मात्र वयोवृद्ध कलावंतांना मिळणारा हा मानधन दर महिन्याला मिळत नसल्याने कलावंतांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. मानधनावर अवलंबून असलेल्या कलावंताच्या परिवारावर वेळेवर मानधन मिळत नसल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे.
महायुती शासनाने विविध योजना, महामंडळे, लाडकी बहिण योजना सुरू केल्या. मात्र वयोवृद्ध कलावंतांना त्यांना मिळणारे मानधन मागील चार महिन्यापासून न दिल्याने परिवारातील लोकांवर संकटं निर्माण झाली असून यावेळी महत्त्वाचा सण दिवाळी पूर्णपणे अंधारात साजरी करावी लागणार आहेत. शासनाने तात्काळ वयोवृद्ध कलावंत यांना त्यांच्या खात्यात मागील चार महिन्यापासून थकीत असलेले मानधन दिवाळी पूर्व त्वरित टाकावे, अशी मागणी लोक कलावंत फाउंडेशनचे अध्यक्ष रफीक कुरेशी यांनी केली आहे.