नवी मुंबई प्रतिनिधी:
शनिवार दिनांक 31 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी पाच वाजता ज्येष्ठ नागरिक भवन मध्ये ज्येष्ठ नागरिक सार्वजनिक ग्रंथालयाचा अकरावा वर्धापन दिन सोहळा श्री विकास साठे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात साजरा झाला. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली तसेच श्री रमेश गायकवाड यांनी “खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे , हे साने गुरुजींचे गीत गाऊन कार्यक्रमाला सुरुवात झाली . पाहुण्यांचे व उपस्थितांचे स्वागत श्री सुनील आचरेकर, ग्रंथालयाचे सचिव यांनी केले तर प्रस्तावना श्री प्रकाश लखापते यांनी केली.
या कार्यक्रमाला प्रमुख व्याख्याते प्राध्यापक श्री नारायण बारसे, श्रीमती सुनिता तांबे , लेखिका, कवियत्री लाभल्या होत्या. तसेच विशेष अतिथी म्हणून श्रीमती तेजस्विनी अधिकारी, उद्योजिका , श्री दि ना चापके , सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आणि अरविंद वाळवेकर , ज्येष्ठ नागरिक संस्थेचे अध्यक्ष उपस्थित होते. प्राध्यापक बारसे म्हणाले की वाचन संस्कृती लोप पावत चाललेली नसून नवीन अत्याधुनिक तंत्र ज्ञानाच्या साह्याने ती अधिक विकसित होत आहे.
विद्यार्थी अधिक तंत्रस्नेही असल्यामुळे याचा चांगला उपयोग करून घेत आहेत व त्यांना त्याचा चांगला उपयोगही होत आहे . आंतरजालामुळे जगातील सर्व ग्रंथालय जोडली गेली आहेत . आपण या डिजिटल तंत्रज्ञानाचा सकारात्मक दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे आणि त्याचा वापर करून घेतला पाहिजे. श्री बारसे यांनी मुद्रण कलेच्या शोधापासून ते आज तागायत पुस्तक क्रांतीचा इतिहास मांडला. , आपल्या अभ्यासपूर्ण शैलीत त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने वाचन संस्कृती कशी विकसित होत आहे हे प्रभावीपणे मांडले. तसेच श्रीमती सुनिता तांबे यांनी वाचनाने मला काय दिले यासंदर्भात बोलताना त्यांनी स्वतःच्या उदाहरणावरून वाचना मुळेच मी घडले आणि भौतिक प्रगती करू शकले तसेच लेखिका आणि कवयित्री घडू शकली हे आपल्या उदाहरणाने पटवून दिले.
श्री विकास साठे आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की वाचनामुळे माणसाला उभारी मिळते, ऊर्जा मिळते. त्याला एकाकी पण राहत नाही, पुस्तक हाच खरा मित्र आहे. तंत्रज्ञाने कितीही प्रगती केली असली तरी पुस्तक घेऊन वाचण्यात एक वेगळीच मौज असते असे प्रतिपादन केले. वर्धापन दिन “एक विचारांचा उत्सव म्हणून नेरूळ जेष्ठ नागरिक सार्वजनिक ग्रंथालयाने ” साजरा केला. उपस्थित मान्यवरांचे आभार श्री सुनील आचरेकर, ग्रंथालय सचिव यांनी केले तसेच कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन सौ सुचित्रा कुंचमवार यांनी केले.
या कार्यक्रमास सर्वश्री अण्णासाहेब टेकाळे ,प्रभाकर गुमास्ते ,दीपक दिघे, अजय माढेकर , गज आनन म्हात्रे, विजय औंधे, रणजीत दीक्षित ,नंदलाल बॅनर्जी , विजय सावंत , दत्ताराम आंब्रे, सीमा आगवणे , रमेश साळवे, मंजुषा साळवे, रूपाली माहुलकर , सुजाता माहुलकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या सुंदर कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.