तुमची हेलपाटा कादंबरी मी दोनदा वाचली आहे.पुनः कादंबरी वाचनेचा मोह आवरता आला नाही….! तुमच्याकडून अप्रतिम कादंबरी लिहीली गेली आहे. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्यात तुमच्या वाट्याला आलेले खडतर आयुष्य , कष्ट कमी अधिक प्रमाणात त्यांच्याही वाटेला आल्यामुळे ही कादंबरी वाचणीय झाली आहे. कादंबरी एकदा वाचायला सुरुवात केली की वाचनेची थांबुच नये असे वाटते.
जन्मापासून ते शासकीय सेवेत नियुक्ती होईपर्यंत आयुष्यात वास्तवात ज्या घटना घडल्या त्या ग्रामीण भागातील बोली भाषेत ओघवत्या शब्दात लिहिल्या आहेत. तानाजी महाडला ग्रामसेवक पदावर हजर झाले तेव्हां मी विस्तार अधिकारी ग्रामपंचायत या पदावर कार्यरत होतो. तानाजी कवी आहे किंवा साहित्यिक आहे याची कार्यालयातील कोणत्याही अधिकारी व कर्मचारी यांना काहीही कल्पना नव्हती .साहित्या बाबत तानाजी यांनीही कधीही स्वतः बाबत कोणाला सांगितले नाही.
ग्रामीण भागातील जनतेची सेवा अंत्यत प्रामाणिक कर्तव्य पार पाडत होते.
कामावरून तानाजी यांना कधीही पंचायत समिती स्तरावरील कोणत्याही अधिकारी यांना कामाबाबत बोलण्याची वेळ आली नाही. तानाजी नोकरीत स्थिर झाल्यानंतर त्यांच्या लेखनाच्या प्रतिभेने त्याला स्वस्थ बसू दिले नाही. शालेय जीवनात तानाजी कविता करीत होते परंतु त्यांच्या शिक्षिका यांनी तानाजीला कवितेमुळे पोट भरणार नाही अभ्यासात लक्ष केंद्रित करून शिक्षण पूर्ण करावे असा सल्ला दिला होता. हा प्रसंग ही तानाजी यांनी कादंबरीत नमूद केला आहे. शिक्षिका यांच्या सल्यानुसार नोकरीत लागल्यानंतर दोन वेळच्या कुटुंबाची भोजनाची व्यवस्था झाल्यानंतर तानाजी यांच्यातील साहित्यिक पुन्हा जागा झाला आहे .
त्यांचे अनेक कविता संग्रह व “हेलपाटा” ही कादंबरी प्रसिद्ध झाली आहे. “हेलपाटा” कादंबरीला संबंध महाराष्ट्रात अनेक पुरस्कार मिळाले आहेत. तानाजी यांचे वडील व मोठे बंधु यांनी कित्येक वर्षे मोठ्या शेतकऱ्याकडे सालगडी म्हणून मोलमजुरीचे काम केले आहे. वडिलांना पूर्ण आयुष्यात काम करताना गरिबीमुळे चप्पल किंवा बूट घालता आला नाही. वडिलांच्या पायात काटे रुतल्याने खुरपे झाली होती. दुष्काळात तानाजीच्या कुटूंबाचे प्रचंड हाल झाले.बहिणीच्या लग्नाच्या कार्यासाठी जीवापाड जपलेले बैल विकावे लागले. बाजारात एक बैल विकला व एक परत घरी आणताना मुसळधार पावसाने नदीला पुर आल्याने बैल पुराच्या पाण्यात वहाऊन गेला .
वडील रात्रभर पावसात ओलेचिंब भिजून झाडावर बसून राहिले कसेबसे स्वतःचे प्राण वाचवले व दुसऱ्या।दिवशी पुराचे पाणी कमी झाल्यानंतर घरी पोहोचले. तानाजीकडे गाय होती त्या गाईची तानाजी यांच्या कुटूंबाला अनेक वेळा आर्थिक अडचणीत मदत झालेली होती. त्यांची उतराई म्हणून त्या गायीचा नैसर्गिकरित्या मृत्यू होई पर्यत तिचा सांभाळ केला.गायीची बाजारात विक्री करावी म्हणून आई व वडिलांच्या मनात विचार कधीही आला नाही. मृत्यू झाल्यानंतर स्वतःच्या शेतात सन्मानाने तिचे अंत्यसंस्कार केले. बहिणीचे बाळंतपण , तिचे दगवलेले मुलं गरिबीमुळे वेळोवेळी सोडावी लागलेले शिक्षण, मुंबईत येऊन मेव्हणे यांचे बरोबर डोक्यावर टोपली घेऊन केलेल्या भाजीपाल्याचा व्यवसाय त्यातून मिळाले पैसे आईवडिलांना देणेत आले.
त्याच व्यवसायातून मिळालेल्या पैशातून छोटेसे घरही बांधले.घर बांधणारा मिस्त्री न आल्याने तानाजी यांनी स्वतः घराची लादी बसवली व अन्य कामेही त्यांनीच केली. प्रथम शाळा सोडून मुबंईला जाताना त्यांच्या मनाची झालेली तगमग त्यामुळे सतत डोळ्यावाटे वाहणारे अश्रू , हे सारे प्रसंग वाचताना वाचकही गहिवरुन जातो . प्राथमिक व माध्यमिक शिक्षक यांनी ही तानाजी यांना वेळोवेळी केलेली खूप मोलाची मदत व तानाजीवर केलेले प्रेम यामुळेच तानाजी यांना कृषी पदविका पर्यत शिक्षण पूर्ण करता आले आहे. हे सगळे प्रसंगाची तानाजी यांनी खूप सुरेख मांडणी केली आहे. “हेलपाटा ‘कादंबरीतील हे प्रसंग वाचताना वाचकांच्या डोळ्यातून भावस्पर्शी प्रसंगाने अनेक वेळा डोळ्यातून आपोआप अश्रू येतात.
तानाजी यांनी अतिशय सुंदर ” हेलपाटा” कादंबरी लिहिली आहे.या कादंबरीचे कौतुक महाराष्ट्रातील नामवंत लेखक साहित्यिक यांनी केलेले आहे. अनेक संस्थेकडून तानाजीचे सत्कार व गौरव होत आहेत. त्यामुळे तानाजीचा एक सहकारी अधिकारी म्हणून खूप अभिमान वाटतो. तानाजी हे सद्या “पायपीट” ही कादंबरी लिहित आहेत.याही कादंबरीची खूप उत्सकता आहे. ‘पायपीट”याही कादंबरीला असेच भरघोस येश मिळो आशा मनापासून शुभेच्छा देतो. तुमच्या कडून भविष्यात अतिशय उत्कृष्ट दर्जाचे साहित्याची निर्मिती होवो अशी विध्यात्याकडे प्रार्थना करतो.
कादंबरी – हेलपाटा
लेखक- तानाजी धरणे
परीक्षण -49 वे
पृष्ठे -144
मूल्य -225
प्रकाशन -पी आर ग्रुप आॅफ पब्लिकेशन वरुड,अमरावती
परीक्षण – बालाजी पुरी
गटविकास अधिकारीवर्ग 1 (सेनि)
पंचायत समिती खालापूर
जिल्हा रायगड